भले श्रेय तुम्ही घ्या; पण, शाई धरण बांधा ; शानू पठाण यांचे सत्ताधार्यांना आवाहन
ठाणे (प्रतिनिधी)- शाई धरण हे श्रेय न घेण्याच्या पार्श्वभूमीवर जर बांधले जात नसेल तर तुम्ही ते घ्या; पण, लवकरच शाई धरण बांधा, असे आवाहन ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ शानू पठाण यांनी केले.
मिलींद पाटील आणि सुहास देसाई यांनी ठाणे महानगर पालिकेच्या महासभेमध्ये पाणी टंचाईवर लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर भाषण करताना शानू पठाण यांनी आपल्या 15 मिनिटांच्या भाषणात शहरातील पाणी समस्येवर परखड विवेचन केले. ते म्हणाले की, यंदा परतीच्या पावसाने दगा दिला आहे. त्यामुळे डिसेंबरमध्येच पाणी कपात करण्यास सुरुवात केली आहे. सध्या शहरामधील अनेक भागात 24 तासांची पाणी कपात सुरु केली आहे. वास्तविक पाहता, 24 तासांची मर्यादा असली तरी प्रत्यक्षात ठाणे शहराला आठवड्याला 30 तासांची पाणी कपात सहन करावी लागत आहे. आता 30 तासांची कपात केली जाणार आहे. याचाच अर्थ ठाणेकरांना आठवड्याला 40 तास पाण्याची टंचाई सहन करावी लागणार आहे. ही समस्या निर्माण होण्यामागे सत्ताधार्यांचाच मोठा वाटा आहे. आज जर शाई धरण बांधून झाले असते तर आपणाला पाण्यासाठी मुंबई पालिका, एमआयडीसी किंवा स्टेमककडे पहावे लागले नसते. म्हणूनच सर्वांनी पुढाकार घेऊन शाई धरण कसे प्रत्यक्षात साकारेल, याचा विचार केला पाहिजे. क्लस्टर डेव्हलपमेंटचा मुद्दा आ. आव्हाड यांनी उपस्थित करुन आंदोलन उभे केले होते. त्या आमदोलनात शिवसेना, काँग्रेसही सहभागी झाली. त्यामुळे क्लस्टरचा मुद्दा मार्गी लागला. त्याचप्रमाणे आता पाण्याच्या मुद्यावरही सर्वपक्षीयांनी एकत्र यावे. जरी , शाई धरणासाठी आ. जितेंद्र आव्हाड हे आग्रही असले तरी ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी ते घ्यावे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाने भेट घ्यावी; आणि या धरणाचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन शानू पठाण यांनी केले.
No comments