Header Ads

  • ताजा खबरें

    कोल्ही व वरचे ओवळे गावांच्या मंदिर बांधणीच्या कामास वेग


    विमानतळ पुनर्वसन क्षेत्रात बांधण्यात येत आहेत मंदिरे
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरीत होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना 22.5% व पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम पॅकेजसोबतच प्रकल्पबाधितांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी सिडकोतर्फे पुनर्वसन व पुन:स्थापना क्षेत्रात भूखंडदेखील देण्यात आले आहेत. त्यांपैकी वरचे ओवळे व कोल्ही गावांच्या मंदिरांसाठी काही महिन्यांपूर्वी बांधकाम परवाने देण्यात आले असून सदर गावांतर्फे मंदिर बांधणीचे काम वेगाने सुरू आहे.
    विमानतळ प्रकल्पबाधित सर्व दहा गावांच्या मागण्यांनुसार त्यांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी एक भूखंड देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहा गावांपैकी वरचे ओवळे, कोल्ही, तरघर, चिंचपाडा, गणेशपुरी, उलवे व कोपर या गावांतील मंदिरांसाठी भाडेपट्टा करारनामा करण्यात आला आहे. सिडकोतर्फे गावातील मुख्य मंदिराच्या बांधकामासाठी रू. 1 कोटी देण्यात येणार असून भाडेपट्टा करार केल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी त्या रू. 1 कोटी निधीतील 50 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येणार आहेत. त्यानुसार वरचे ओवळे, तरघर, कोल्ही व कोपर गावांना रू. 50 लाख देण्यात आले. तर गणेशपुरी व उलवे गावातील मंदिरांसाठी रू. 50 लाख देण्यात येतील. त्याचबरोबर प्रत्येक गावातील मुख्य मंदिरांव्यतिरिक्त इतर मंदिरांच्या बांधकामांसाठी त्या मंदिरांचे मूल्यांकन करून त्यानुसार निधी देण्यात येणार आहे.
    या संदर्भात सिडकोतर्फे इतर प्रल्पबाधित गावांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनीदेखील लवकरात लवकर मंदिरांसाठीच्या बांधकाम परवान्याची प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास सुरूवात करावी. प्रकल्पबाधितांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा यासाठी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यामुळेच विमानतळाचे काम योग्य दिशेने व वेगात सुरू आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad