अखेर अतिक्रमण विरोधी मोहिमेला मुहूर्त मिळाला; पहिल्याच दिवशी शेकडो अनधिकृत शेड, अतिक्रमणे भुईसपाट
बदलापूर : काही दिवसांपूर्वी कुळगाव बदलापूर नगरपालिकेची नियोजित अतिक्रमण विरोधी कारवाई पोलीस संरक्षण न मिळाल्याने पुढे ढकलण्यात आली होती, आज अखेर अतिक्रमण विरोधी मोहिमेला मुहूर्त मिळाला, पालिकेने पोलीस बंदोबस्त मिळताच पूर्व भागातील शेकडो अनधिकृत शेड आणि अतिक्रमणे भुई सपाट केली.
पूर्व भागात मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आलेल्या या कारवाईत पहिल्याच दिवशी शेकडो अनधिकृत शेड तसेच अतिक्रमणे भुईसपाट करण्यात आली असून आणखी दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेने सुमारे महिन्याभरापूर्वी शहरातील ७६८अतिक्रमणांना नोटीस बजावल्या होत्या.बदलापूर पूर्व भागात कारवाईसाठी ४ डिसेंबरपासून तीन दिवसीय मोहीम हाती घेण्यात येणार होती. पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने ही कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. तसेच या मोहिमेसाठी १३ डिसेंबर ही नवी तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत वेंकीज हॉटेल ते घोरपडे चौकापर्यंतच्या अनेक अनधिकृत शेड व अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत ज्या काही ठराविक अतिक्रमणांवर कारवाई करण्यास नगर परिषद टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत होता अशा अतिक्रमणांवरही नगर परिषदेने धडक कारवाई केली असून याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच यापुढील दोन दिवसातही मुख्याधिकाऱ्यांनी कारवाईचा धडाका असाच सुरु ठेवून समन्यायी पद्धतीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरीक व्यक्त करीत आहेत.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
या कारवाईसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी, महिला पोलीस या कारवाईदरम्यान उपस्थित होते. नागरिकांना कारवाईच्या ठिकाणापासून दूर ठेवण्यात येत होते. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात होते.
दुकानदारांची तारांबळ
नगर परिषदेने ४ डिसेंबरपासून तीन दिवसीय अतिक्रमण विरोधी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अनेक दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली होती. परंतु अनेक दुकानदार मात्र निर्धास्त होते. नगर परिषदेच्या धडक कारवाईला सुरुवात झाल्यानंतर मात्र अनेकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली.
आज सकाळपासून कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, सहाय्यक नगररचनाकार गौतम यांच्यासह नगर परिषदेचे अभियंते, अधिकारी -कर्मचारी यांनी अतिक्रमण विरोधी मोहिमेला सुरुवात करीत जेसीबीच्या साहाय्याने अनेक अनधिकृत शेड व अतिक्रमणे भुईसपाट केली.

No comments