Header Ads

  • ताजा खबरें

    प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांना पं. राम मराठे तर नृत्यांगना सुज्ञा नाईक यांना युवा पुरस्काराने सन्मानित बासरी, व्हायोलीन व सारंगी वादन या ‘त्रिनाद’ वादनाने संगीत महोत्सवाची सांगता

     बासरी, व्हायोलीन व सारंगी वादन  या ‘त्रिनाद’ वादनाने  संगीत महोत्सवाची सांगता

    ठाणे: . संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पं. राम मराठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ठाणे महानगरपालिकेच्यावतीने देण्यात येणा-या राज्यस्तरिय पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर यांना तर भरतनाट्यम नृत्यांगना सुज्ञा नाईक यांना राज्यस्तरीय युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
           यावेळी शिवेसना गटनेते दिलीप बारटक्के, अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे,परिवहन सदस्य राजेंद्र महाडिक,उपायुक्त संदीप माळवी,अखिल भारतीय नाट्य,परिषद ठाणे शाखेचे प्रमुख कार्यवाह नरेंद्र बेडेकर आदी उपस्थित होते.    
               संगीत क्षेत्रात भरीव योगदान केलेल्या प्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उल्हास कशाळकर  यांना राज्यस्तरिय पं. राम मराठे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख रूपये 25 हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वालियर,जयपूर,आणि आग्रा या घराण्याची गायकी अतिशय उत्तमरित्या आत्मसाद करून पं.कशाळकर यांनी संपूर्ण जगभर त्याचे सादरीकरण केले आहे.शास्त्रीय संगीतातील त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना यंदाच्या  पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर युवा पुरस्काराने भरतनाट्यम नृत्यांगना सौ.सुज्ञा नाईक यांना सन्मानित करण्यात आले. रोख रूपये 11 हजार आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सुज्ञा नाईक यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याचे धडे गुरु शेठे व गुरु पूनम मुर्डेश्वर यांच्याकडे घेतले आहे. नालंदा महाविद्यालयातून भरतनाट्यम ही पदवी प्राप्त केल्यानंतर भरतनाट्यममधील अभिनय व नृत्याविष्कारासाठी त्यांना ‘शृंगारमणी’ हा किताब देखील प्राप्त झाला आहे.गेली २० वर्ष भरतनाट्यमसाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे.त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना पं. राम मराठे स्मृती युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

           दरम्यान पं.राम मराठे संगीत समारोहाच्या पाचव्या दिवसाची सुरूवात अंतर्नाद निर्मित,अपूर्वा प्रोडक्शन्स,प्रेझेंटस “श्यामराम’’ त्या, त्यांचे प्रश्न आणि कृष्ण या नाट्य संगीत नृत्याविष्काराने झाली. भगवान श्रीकृष्णाच्या आयुष्यात येणाऱ्या स्त्रियांना पडणाऱ्या प्रश्नांचे अंतरंग शोधण्याचा प्रयत्न या नाटकाद्वारे करण्यात आला आहे.पूर्णता नवीन संगीत असलेल्या या नाटकात अभंग,गझल, लावणी,ओवी,श्लोक व भक्तीगीते या सर्वांचा सुरेख आस्वाद रसिकांनी घेतला.  या संगीत समारोहाचा समारोप प्रसिद्ध बासरी वादक पं.रूपक कुलकर्णी,प्रसिद्ध व्हायोलीन वादक पं.कैलाश पात्रा व सारंगी वादक उस्ताद फारुख लतीफ खान या तिघांच्या बासरी, व्हायोलीन व सारंगी या त्रिनाद वादनाच्या जुगलबंदीने झाली. त्यांना तेवढीच तोलामोलाची साथ प्रसिद्ध तबलावादक  कालिनाथ  मिश्रा व तानपुरावर रोशनी सरोडी यांनी साथ केली.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad