शासनाच्या महापरिवर्तन योजनेतंर्गत दोन प्रकल्पांबाबत ठाणे महानगरपालिका व रूबल नागी फौंडेशनसोबत सामंजस्य करार
ठाणे (३१):राज्य शासनाच्या महापरिवर्तन या उपक्रमातंर्गत शहरातील झोपडपट्ट्यांना आकर्षक रंगसंगतीत रंगविणे तसेच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रकला प्रशिक्षण देणे या दोन योजनांबाबत आज रूबल नागी फौंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या दरम्यान सामंजस्य करारावर महापालिका आयुक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अतिरिक्त आयुक्त(२) समीर उन्हाळे यांनी तर रूबल नागी फौंडेशनच्यावतीने रूबल नागी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
महापरिवर्तन उपक्रमातंर्गत समाजातील विविध स्वयंसेवी संस्थांनी विविध सामाजिक विषय आणि आदर्श मुल्यांबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस यांनी केले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रात महापरिवर्तन उपक्रमातंर्गत एकून ६ प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये झोपडपट्टी रंगविणे आणि महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रकला प्रशिक्षण देणे हे दोन प्रकल्प रूबल नागी फौंडेशनच्य्वतीने राबविण्यात येणार आहेत.
या दोन प्रकल्पाच्या अनुषंगाने आज रूबल नागी फौंडेशन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या दरम्यान आज सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यापूर्वीही रूबल नागी फौंडेशनच्या माध्यमातून शहरातील इंदिरानगर आणि डोंगरीपाडा या दोन झोपडट्टी रंगविण्यात आल्या होत्या. सद्यस्थितीत पारसिक रेतीबंदर येथील आठ झोपडपट्टी रंगविण्याचा उपक्रम सुरू आहे.
त्याचप्रमाणे महापालिकेच्या १०० शाळांमध्ये चित्रकला प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यासाठी येणारा खर्च महापालिकेच्यावतीने करण्यात येणार असून सन २०१९-२० या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात येणार आहे. रूबल नागी फौंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभर स्लम पेटिंग आणि आर्ट स्कूल हे प्रकल्प राबविण्यात आले आहेत.
याबरोबरच महापरिवर्तन उपक्रमातंर्गत टाटा ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेच्या १०० शाळांमध्ये हात धुण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर टाटा ट्रस्ट व वर्ल्ड रिसोर्स इंस्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने वन संगोपन व संवर्धन याविषयी माहिती तयार करणे व त्याबाबत जनजागृती करणे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
रेमण्ड कंपनीच्यावतीने महापालिका शाळांमध्ये मूल्य संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे तर जेके ग्रामविकास ट्रस्ट( रेमण्ड) या कंपनीच्यावतीने ३ हजार रस्त्यांवरील मुलांसाठी कौशल्य विकास आणि पुनर्वसन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
No comments