सीमांकन निश्चित केल्याशिवाय क्लस्टर येऊ देणार नाही -आ. जितेंद्र आव्हाड यांचा आगरी- कोळी बांधवांसाठी लढण्याचा निर्धार
ठाणे (प्रतिनिधी)- सीमांकन निश्चित केल्याशिवाय क्लस्टर येऊच शकत नाही. हीच राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही सिमांकन झाल्याशिवाय क्लस्टर येऊ देणार नाही.पण, शिवसेना सत्ता सत्ताधारी आहे. त्यामुळे शिवसेनेने ही भूमिका नाकारली तर घात होऊ शकतो. म्हणून येथे उपस्थित असलेल्या आगरी- कोळी नेत्यांनी शिवसेनेवर दबाव आणावा. तुम्ही जेव्हा बोलावाल तेव्हा मी उपस्थित राहेन आणि तुमचे नेतृत्व स्वीकारुन लढ्यात सहभागी होईन, असे आश्वासन देत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आगरी-कोळी समाजाच्या लढ्यात सक्रीय सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेच्या वतीने भूमिपुत्रांच्या वतीने विविध मागण्यांसाठी बुधवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा दिला. यावेळी दशरथ पाटील, अनंत तरे, आनंद परांजपे, मिलींद पाटील, भरत चव्हाण आदींसह शेकडो आगरी- कोळी समाजबांधव उपस्थित होते.
यावेळी आ. आव्हाड यांनी आगरी- कोळी समाजबांधवांना संबोधीत करताना सांगितले की, सीमांकनाचा लढा दशरथ पाटील यांनी केली. प्रापर्टी कार्डवर नावे येण्यासाठी जो दबाव टाकण्यात आला आहे. त्या मागे दशरथ पाटील यांचे योगदान मोठे आहे. क्लस्टरची योजना आल्यानंतर त्यांनी आपणाला भूमिका घ्यावी लागेल, असे सांगितले. जरी ते सेनेचे असले तरी शरद पवारांना मानणारे असल्याने आमचे नाते जवळचे आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रसने आधी सीमांकन आणि नंतर क्लस्टर अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि विरोधी पक्षनेते मिलींद पाटील यांनी जाहीर केले की जो पर्यंत गावठाणांचे सीमांकन केले जात नाहीत. तो पर्यंत क्लस्टरला मंजुरी देऊ नये, अशी मागणी ठामपाकडे केली आहे. तसेच, या शहराचा पहिला आमदार म्हणून तसेच राजकीय पक्ष म्हणून आम्ही उघडपणे ही भूमिका घेतली. मी विधानसभेमध्ये शांत बसणारा आमदार नाही. मुख्यमंत्री ज्या वेळी या लक्षवेधीवर बोलत होते. त्यावेळी आपण मुख्यमंत्र्यांना अडवून बोललो की, पहिल्यांदा एसआरएचे काय करायचे, सीमांकनाचे काय करायचे, ही भूमिका जाहीर करा; नंतर बाकीची चर्चा होत राहू द्या. त्यावर मुख्यमंत्र्यांनीच आधी सीमांकने निश्चित करु आणि नंतर एसआरए पुढे घेऊन जाऊ असे जाहीर केले. अजून त्याचा जीआर आलेला नाही. त्यामुळे आपणाला मुख्यमंत्र्यांना भेटावे लागेल. त्यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करुन द्यावी लागेल. हे सर्व एकत्रितरित्या करु या. त्यामुळे समाजातील नेतृत्वाच्या हाताखाली काम करु या.. कारण, तुमच्या समस्या या केवळ जमिनीशी नाहीत. तर, जाळ्यांशीही संबधीत आहेत. पर्सीनेट नावाच्या ज्या जाळ्या आहेत. त्या जाळ्या पुढे गेल्या तर तुमची मासेमारीच बंद होणार आहे. त्यावर पहिला प्रश्न आपणच उपस्थित केला होता. प्रश्न उदरनिर्वाहाचा आहे.. खानदानी व्यसवसायाचा आहे.
कोळीण भगिणींच्या मासळी विक्रीच्या व्यवसायावर अतिक्रमण होत आहे. यात दुमत नाही. पण, शासनाने मासे विक्रीसाठी एका जागेची निश्चिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने मासळी विक्रीसाठी एक मोठा पट्टा तयार करुन द्यायला हवा. तसे झाले तरच सर्वसमावेशक तोडगा निघू शकेल. शिळ-दिवा- म्हातार्डीमध्ये बुलेट ट्रेनसाठी सर्व्हे होणार होता. तेथील सर्व्हे आम्हीच उठवून लावला आहे. आज त्याच जमिनीवर आरक्षण आणले जात आहे. ते आरक्षण आमचे नगरसेवक उधळून लावतील. म्हातार्डीला स्टेशन आल्यावर मेट्रो आणायला लागेल. अहमदाबादच्या माणसासाठी आम्हाला बुलेट ट्रेन नकोय. जमीन उद्धवस्त करणारे आणि गोगरीबांना भिकेला लावणारे धोरण आहे. आहेत 1 लाख 50 हजार कोटींची उधळपट्टी करुन बुलेट ट्रेन आणायची आहे. त्यापेक्षा रेल्वेसेवा चांगली करा ना!, असे सांगून आगरी -कोळी बांधवांचे नेतृत्व त्यांच्यातीलच एकाने करावे. आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संघष करण्यास तयार आहोत, असे जाहीर केले.

No comments