ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ ; ३५० कुस्ती मल्लांची विक्रमी नोंद
ठाणे: ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ, ठाणे यांचे संयुक्त विद्यमाने राज्य व जिल्हास्तरीय ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेस तमाम कुस्तीशौकीनांच्या उपस्थितीत आज महापौर सौ.मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांचे शुभहस्ते कुस्ती लावून शानदार प्रारंभ झाला.दरम्यान यावर्षी ठाणे महापौर चषक स्पर्धेसाठी पुरूष, महिला आणि कुमार गटात विक्रमी ३५० मल्लांनी नोंद केली आहे.
यावेळी क्रीडा व समाजकल्याण व सांस्कृतिक कार्य समिती सभापती दिपक वेतकर,नगरसेविका स्नेहा रमेश आंब्रे,उप आयुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुरेश ठाणेकर, सचिव रामकांत पाटील,उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, पै.रंगराव पाटील आदी उपस्थित होते.
महापौर चषक कुस्ती स्पर्धेसाठी यंदा जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील मल्लांनी हजेरी लावली आहे. कुस्तीशौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या एकापेक्षा एक कुस्त्या घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील या मैदानात सुरु आहेत.
या स्पर्धेसाठी तीन गटात एकूण साडे सहा लाखाची बक्षिसे असून महापौर केसरी विजयी मल्लास 1 लाख रूपये व चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे. या स्पर्धा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व ठाणे शहर तालीम संघ यांच्या सहकार्याने होत असून पुरूष, महिला आणि कुमार गटात सुरु आहेत. आज एकूण 90 कुस्त्या पार पडल्या. पहिल्या फेरीतील विजयी मल्लांच्या व महापौर चषक या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची कुस्ती उद्या गुरुवार दिनांक २८ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजता घोडबंदर रोडवरील मानपाडा येथील उड्डाणपूल चौक, टायटन हॉस्पिटलच्या बाजूला, लॉरी स्टॅण्ड, टिकूजीनीवाडी रस्ता, मानपाडा येथे संपन्न होणार आहेत तरी सर्व कुस्तीशौकीना या स्पर्धेला उपस्थित राहून कुस्ती स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments