Header Ads

  • ताजा खबरें

    वरचे ओवळे गावाच्या मंदिर उस्थापन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू

    मंदिरातील देवांचे होणार विमानतळ पुनर्वसन क्षेत्रात विस्थापन
    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरीत होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना 22.5% व पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम पॅकेजसोबतच प्रकल्पबाधितांच्या गाव मंदिरांसाठी सिडकोतर्फे पुनर्वसन व पुन:स्थापना क्षेत्रात भूखंडदेखील देण्यात आले आहेत. त्यांपैकी वरचे ओवळे गावाने मंदिराचे बांधकाम सुरू असतानादेखील ग्रामदैवत व कुलदैवताची नवीन जागी प्राणप्रतिष्ठा करण्याचा उस्फूर्तपणे निर्णय घेऊन सिडकोला हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प मार्गी लावायला मोठे सहकार्य केले आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी गावातील कुलदैवत व ग्रामदैवत श्री. गणपती व श्री. काळभैरव या देवांचे उस्थापन विधी संपन्न होणार असून दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी मंदिरातील देवांची रथातून मिरवणूक काढून करंजाडे नोड येथील विमानतळ पुनर्वसन क्षेत्रात तात्पुरत्या प्रयोजित जागी वरचे ओवळे गावातील कुलदैवत व ग्रामदैवत श्री. गणपती व श्री. काळभैरव या देवांची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. 
     सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा यांची उपस्थिती असणार आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०१८ रोजी साग्रसंगीत उस्थापन विधी व पूजा पार पडल्यानंतर दिनांक १ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ९. २५ मि. वरचे ओवळे गावापासून ते सेक्टर १, करंजाडे नोड येथे रथातून वाजत गाजत पायी भव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. विमानतळ प्रकल्पबाधित दहा गावांपैकी प्रकल्पबाधित कोल्ही गावाच्या मंदिरासाठीदेखील काही महिन्यांपूर्वी बांधकाम परवाने देण्यात आले असून या गावातर्फेदेखील मंदिर बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. अशा प्रकारचेच सहकार्य उर्वरित गावांनीदेखील दाखवावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे. 
     विमानतळ प्रकल्पबाधित सर्व दहा गावांच्या मागण्यांनुसार त्यांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी एक भूखंड देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहा गावांपैकी वरचे ओवळे, कोल्ही, तरघर, चिंचपाडा, गणेशपुरी, उलवे व कोपर या गावांतील मंदिरांसाठी भाडेपट्टा करारनामा करण्यात आला आहे. सिडकोतर्फे गावातील मुख्य मंदिराच्या बांधकामासाठी रू. 1 कोटी देण्यात येणार असून भाडेपट्टा करार केल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी त्या रू. 1 कोटी निधीतील 50 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येणार आहेत. 
     या संदर्भात सिडकोतर्फे इतर प्रल्पबाधित गावांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनीदेखील लवकरात लवकर गाव मंदिरांसाठीच्या बांधकाम परवान्याची प्रक्रिया पूर्ण करून नवीन मंदिराच्या बांधकामास सुरूवात करावी. प्रकल्पबाधितांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा यासाठी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद व सर्वतोपरी सहकार्य दिले आहे. यामुळेच विमानतळाचे काम योग्य दिशेने व वेगात सुरू आहे. प्रकल्पबाधितांच्या अशाच सातत्याने मिळत असलेल्या सहकार्यामुळे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत हा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad