जनादेश गौरवसंध्येत मान्यवरांनी केला गौरव
ठाणे (बदलापुर विकास मिडिया): त्यानं मरणच पाठीवर मारून मैदाने गाजवली. अक्षरांची दगडफेक आणि शब्दांचा गोळीबार करणारा हा संपादक केवळ अद्वितीय आहे. तो साक्षात कैलाश पर्वताएवढा झालाय. अशा शब्दांत चळवळींचे ज्येष्ठ नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी जनादेश गौरव संध्येत कैलाश म्हापदी आणि दैनिक जनादेशचा गौरव केला. त्यांच्याहस्ते `कैलाश : एक कहानी है दिये और तुफान की' तर आ. कपिल पाटील आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्याहस्ते `जाणीवांचा तळ छेदताना' या दोन पुस्तकांचं प्रकाशन पार पडलं. रात्रौ 8 वाजेपर्यंत चाललेली ही गौरवसंध्या 31 डिसेंबर असूनही हाऊसफुल्ल गर्दीत पार पडली.


दैनिक जनादेशच्या 15 व्या वर्धापन दिनानिमीत्त आज सरत्या वर्षाला निरोप देताना जनादेश गौरव संध्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्षेत्रात कर्तबगारीची मोहोर उमटविणाऱया 15 अवलियांना जनादेश गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये संपन्न झालेल्या या सोहळयात राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आवजुर्नन उपस्थिती लावली होती. जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छा व आशिर्वादांचा वर्षाव केला. ठाणे जिल्हा पत्रकार संघ व अनेक संघटनांच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरूवात बालगायिका ज्ञानेश्वरी गाडगे हिने गायलेल्या शंकर स्तवनाने झाली. तिला कार्तिकी गाडगे व सौजस मोरे, तेजस मोरे, पुंडलिक मोरे या कलाकारांनी तिला साथ दिली.
प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासह शिक्षक आमदार कपिल पाटील, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, ठाण्याच्या महापौर मिनाक्षी शिंदे, गझलप नवाझ भीमराव पाचांळे, ज्येष्ठ लोककलावंत नंदेश उमप, कोकण विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, अतिरीक्त जिल्हाधिकारी भरत शितोळे, ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे, लोककलेचे अभ्यासक प्रा. गणेश चंदनशिवे, अंनिसंच्या मुक्ता दाभोलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई शिंदे, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, भिवंडीचे आमदार शांताराम मोरे, ठामपा सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी हास्यसम्राट जॉनी रावत, लावणी नृत्यांगना प्रियंका शेट्टी, प्रा. हेमाली शेडगे-म्हात्रे, आंतरराष्ट्रीय शीळ वादक निखील राणे, महिला व पुरूष दोन्ही आवाजात गाणारा गायक विनय कोळी यांनी आपापल्या कला यावेळी सादर केल्या.
अशीच आमची आई असती सुंदर रूपमती, जगी ज्यास कोणी नाही अशी अविट गोडीची उत्तुंग गाणी देणारे ज्येष्ठ कवी व गीतकार मधुकर जोशी यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव करण्यात आला. मधुकर जोशी यांचा सत्कार करताना उपस्थितांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली. त्यांचा गौरव झाल्यावर कैलाश म्हापदींनी माईक हातात घेऊन जोशींना व्यवस्थीत घर नसल्याची खंत जाहीरपणे बोलून दाखविली. ज्येष्ठ साहित्यीका अरुंधती भालेराव, वैद्यकीय क्षेत्रांत भरीव कार्य करणाऱया डॉ. रूबिना फुटÎार्डो, जळत्या घरात घुसून आपल्या दोन लहानग्या नातवंडाना वाचविणाऱया ठमीबाई खडके, ग्रामीण भागात राहूनही स्वतचे साहित्य विश्व निर्माण करणाऱया शशिकला गुंजाळ, वासंती कुंभार, लोककलेच्या मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापक हेमाली शेडगे-म्हात्रे, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे नाव गाजविणारा शिळवादक निखली राणे, ख्यातनाम चित्रकार सुभाष शेगोकर, आत्महत्याग्रस्त शेतकऱयांच्या मुलांचा पालक सुपर डॅड अशोक देशमाने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे, कातकरी बोली भाषेत क्रमिक पुस्तके अनुवादित करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणारे शिक्षक गजानन जाधव, ठाण्यातील मनसे नेते अविनाश जाधव, आजी-आजोबांची शाळा सुरू करणारे शिक्षक योगेंद्र बांगर, शिक्षकांच्या पगारातून चालणारी ठाण्यातील शारदा शिक्षण संस्था, फणीवर गाणी वाजविणारे शशिकांत खानोलकर या सर्वांचा वन मॅन आर्मी जनादेश पुरस्काराने गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वोच्च नेते प्रा. कवाडे म्हणाले की, उपेक्षितांचे प्रश्न मांडण्याचे काम कैलाश म्हापदींनी केले आहे. त्यांच्या रदोन पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. आता त्यांनी आत्मचरित्र लिहावे. त्यातून तरूणांना प्रेरणा मिळेल. कैलाश म्हापदी यांचे जीवन संघर्षमय आहे. समाजातील अन्यायाला पाहून ते व्यथित होतात.
शिक्षक आमदार कपिल पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, सिमेंटच्या जंगलात राहणाऱया आपणा सर्वांना आज कैलासने माणसांत आणले आहे. गजानन जाधव यांच्या सारख्या मोठे काम करणाऱया माणसांना मनापासून सलाम. अशी माणसे समाजाचे खरे धन असतात. या माणसांची भेट कैलाश म्हापदी यांनी घडवून आणली.
मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर आपल्या भाषणात म्हणाले की, कैलाश आज खरोखर कैलाश पर्वतापेक्षा मोठा झाला आहे. समाजाने ओवाळून टाकलेली ही पोरं आज समाजाचा आधार बनली आहेत याचा आनंद वाटतो. कैलाशच्या शंभराव्या वाढदिवसाला आपण सर्वांना यायचे आहे असेही ते म्हणाले.
कार्यकमाची रंगत वाढविणारे कलाकारांचे कार्यक्रम यावेळी सादर झाले. प्रियंका शेट्टी यांनी ऐनवेळी सीडीच्या ठेक्यावर नृत्य करणे नाकारून स्वत गाऊन लावणी सादर केली. लावणीनंतर त्यांनी उपस्थितांत जाऊन महिलांनाही नाचायला लावले. उपस्थितीतांतून नंतर त्यांनी मfिहलांना व्यासपीठावर नेऊन नाचायला लावले.
जनादेशचे संपादक कैलाश म्हापदी यांच्याविषयी मान्यवरांनी लिहिलेल्या लेखांचे पुस्तक कैलाश ये कहानी है दिये और तुफान की हे पुस्तकाचे संपादन जनादेशचे कार्यकारी संपादक जयदास मोरे यांनी केले आहे.
No comments