हिंदूंनो, 31 डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे; तर गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करा !
हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदूंना आवाहन !
ठाणे- 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 नंतर ख्रिस्ती नववर्ष आरंभ होते, या निमित्ताने मोठ्या प्रमाणात गैरकृत्ये केली जातात. देशातील ख्रिस्ती बांधवांनी त्यांचा सण कायद्याचे पालन करत अवश्य साजरा करावा; मात्र देशभरातील हिंदूंना आम्ही आवाहन करत आहोत की, हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच गुढीपाडव्याला साजरे करावे ! गुढीपाढव्याला ऐतिहासिक, नैसर्गिक आणि आध्यात्मिक कारणेही आहेत. अशी 1 जानेवारीला नाहीत. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत, धांगडधिंगा घालत, गैरप्रकार करत नववर्षाचा आरंभ करणे, ही आपली संस्कृती नाही. एका पाहणीमध्ये असे समोर आले की, युवक मद्याचा पहिला घोट आणि सिगारेटचा पहिला झुरका यांचा अनुभव 31 डिसेंबरच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मेजवाण्यांमध्ये घेतात. नवीन वर्षाचा आरंभ असा असणे, हे सामाजिक नीतीमत्तेचे हनन करणारे, कायदा-सुव्यवस्था बिघडवणारे आणि युवापिढीला विनाशाकडे नेणारे आहे. अशा वाममार्गांनी वर्षारंभ मंगलदायी कसा होईल ? आज देशात ख्रिस्ती मिशनरींच्या (कॉन्व्हेंट) शाळांमध्ये बायबल शिकवले जाते, मदरशांमध्ये कुराण शिकवले जाते; मात्र हिंदूंना हिंदूंचा कोणताही धर्मग्रंथ कोणत्याही शाळा-महाविद्यालयांत शिकवला जात नाही; परिणामी हिंदुबहुल देशात हिंदूंना धर्मशिक्षणच मिळत नाही, हे दुर्दैव आहे. सर्व पंथांचा आदर करायला हवा; पण आदर करणे आणि अनुकरण करणे, या दोन्ही गोष्टी भिन्न आहेत. एखाद्या पंथाचे सण-उत्सव साजरे करणे, हे त्या पंथाचे अंधानुकरण करणे होय. याचाच अर्थ त्या पंथाची शिकवण मानसिक स्तरावर स्वीकारली असे होते. हे एकप्रकारे मानसिक धर्मांतरच म्हणता येईल. आज देशभरात मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत आहे. ‘येशूला प्रार्थना केल्यावर आंधळ्याला दिसू लागेल, लंगडा चालू लागेल’ असे फसवून; तसेच पैशांचे अमिष दाखवून प्रतीवर्षी 14 लाख हिंदू ख्रिस्ती धर्मात धर्मांतरीत होत आहेत. ईशान्य भारतातील 7 पैकी 5 राज्ये आणि निकोबार बेट हे ख्रिस्तीबहुल झाले आहेत. या ठिकाणी 50 ते 90 टक्के लोकसंख्या ख्रिस्ती झाली आहे. मुंबई नजिकचे उल्हासनगर येथील 28000 कुटुंबे म्हणजेच 1 लाख हिंदू हे ख्रिस्ती झाले आहेत. हिंदूंच्या धर्मांतराचा आरंभ, हा अशाच ख्रिस्ती सणांचे अंधानुकरण करण्यातून होतो ! धर्मांतर ही राष्ट्रीय सुरक्षेसाठी खूप मोठी समस्या आहे. हे लक्षात घेता हिंदूंनी 31 डिसेंबर साजरा न करता गुढीपाडव्याला वर्षारंभदिन साजरा करावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीने केले आहे.
यासंदर्भात ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समिती विविध माध्यमांतून जागृती करते. हस्तपत्रकांचे वितरण, भित्तीपत्रके लावणे, ग्रंथांचे प्रदर्शन लावणे, जागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करणे, गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासन यांना निवेदने देणे आदी वैध मार्गांनी प्रभावीपणे जागृती करण्यात येते, असे हिंदु जनजागृती समितीचे ठाणे जिल्हा समन्वयक श्री. अजय संभूस यांनी कळवले आहे.

No comments