Header Ads

  • ताजा खबरें

    परिचय केंद्राद्वारे राजधानीत महाराष्ट्राची प्रतिमा उंचविण्याचे उत्तम कार्य -खासदार राजू शेट्टी

    नवी दिल्ली,27 : महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे दिल्ली आणि महाराष्ट्राबाहेर राज्याची प्रतिमा उंचविण्याचे काम नेटाने होत असल्याचे गौरवोद्गार हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे खासदार राजू शेट्टी  यांनी काढले.
    खासदार शेट्टी यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देवून श्री. शेट्टी यांचे स्वागत केले. यावेळी श्री. शेट्टी यांचे स्वीय सहायक जगदिश इनामदार, बिहार माहिती केंद्राचे उपसंचालक लोकेश झा , महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा, उपसंपादक रितेश भुयार उपस्थित होते.
    श्री. शेट्टी यांनी यावेळी, परिचय केंद्राच्या वैविद्य उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. शासनातील जनसंपर्क विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांबाबत समाज माध्यमांद्वारे करण्यात येणारी प्रभावी प्रसिध्दी आणि कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राजधानी दिल्लीत सुरु झालेले देशातील सर्वात जुने कार्यालय असणा-या महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रचार प्रसारासाठीही महत्वाचे कार्य  आहे याचा अभिमान वाटतो अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
    दिल्लीस्थित विविध राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीत या कार्यालयाच्या पुढाकाराबाबत श्री. कांबळे यांनी माहिती दिली. दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, परिचय केंद्राची विविध प्रकाशने आदींची माहिती श्री. कांबळे यांनी यावेळी दिली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. शेट्टी यांनी माहिती जाणून घेतली व कार्यालयाच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad