नंदूरबार जिल्हयात कुपोषणामध्ये घट ; निती आयोगाच्यावतीने आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर
नवी दिल्ली,27 : राज्यातील नंदूरबार या आकांक्षित जिल्हयाने आरोग्यक्षेत्रात चांगली कामगिरी केल्यामुळे जिल्हयात कुपोषणामध्ये घट झाल्याचे निती आयोगाने आज जाहीर केलेल्या आकांक्षित जिल्हयांच्या क्रमवारीमध्ये पुढे आले आहे. गतवर्षीच्या पायाभूत क्रमवारीच्या तुलनेत वर्षभरात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हा जिल्हा कुपोषणात घट झालेल्या टॉप 12 जिल्हयामंध्ये आला आहे.
निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नितीआयोगात आयोजित पत्रकार परिषदेत देशातील 111 आकांक्षित जिल्हयांची दुसरी डेल्टा क्रमवारी जाहीर केली. 5 वर्षाखालील मुलांमधील कुपोषणात घट झालेल्या 12 आकांक्षित जिल्हयांमध्ये नंदूरबारचा समावेश आहे. यासोबतच आकांक्षित जिल्हयांच्या यादीत महाराष्ट्रातील उस्मानाबाद 32 व्या तर गडचिरोली 33 व्या स्थानावर आहे. वाशिम जिल्हा 69 व्या तर नंदूरबार 84 व्या स्थानावर आहे.
1 जून ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधी दरम्यान 49 बिंदूच्या आधारावर आरोग्य, शिक्षण, कृषी व जलसंधारण, आर्थिक समावेशन, कौशल्य विकास आणि पायाभूत सुविधा या मानकावर देण्यातआलेल्या गुणांकणानुसार देशातील 111 आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे.
विविध क्षेत्रात मागासलेल्या जिल्हांची आकांक्षित जिल्हे म्हणून निवड करण्यात आली. 5 जानेवारी 2018 रोजी प्रधामंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आकांक्षित जिल्हयांमध्ये केंद्र शासानाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वी एप्रिल आणि मे 2018 या कालावधीतील प्रगतीच्या आधारे जून 2018 मध्ये आकांक्षित जिल्हयांची पहिली डेल्टा क्रमवारी जाहीर करण्यात आली होती.

No comments