Header Ads

  • ताजा खबरें

    मेट्रो प्रकल्प व बेलापूर रेल्वे स्थानकातील विविध सुविधांची सिडकोच्या उपाध्यक्ष तथा सहव्यवस्थापकीय संचालकांतर्फे पाहणी

    सिडकोतर्फे विकसित करण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाला गती प्राप्त झाली आहे. या प्रकल्पाची आज सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्याकडून पाहणी करण्यात आली. या प्रकल्पातील महत्वाचा भाग असलेल्या तळोजा रेल्वे क्रॉसिंगवरील ‘ट्रस’, मेट्रो लाईनवरील स्थानके व डेपो यांची त्यांनी पाहणी केली. त्याचप्रमाणे बेलापूर रेल्वे स्थानकावरील सुरू असलेल्या दुरूस्ती कामांचा देखील त्यांनी आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान मुख्य अभियंता (नवी मुंबई व मेट्रो) श्री. केशव वरखेडकर, मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) श्री. संजय चौटालिया, अतिरिक्त मुख्य अभियंता – 1 (नवी मुंबई व मेट्रो) श्री. के. एम. गोडबोले, अतिरिक्त मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) श्री. शीला करूणाकरन, अधिक्षक अभियंता श्री. एस. ए. नाडगौडा, अधिक्षक अभियंता श्री. डी. आर. हरताळकर, कार्यकारी अभियंता श्री. के. टी. मगरे, कार्यकारी अभियंता श्री. आर. के. बजाज व जनसंपर्क अधिकारी श्रीमती. प्रिया रातांबे उपस्थित होते. 
     तळोजा रेल्वे क्रॉसिंगवरील मेट्रो प्रकल्पासाठी विकसित करण्यात येत असलेल्या महत्वपूर्ण भागाची म्हणजेच ‘ट्रस’ ची व्यवस्थापकीय संचालकांनी पाहणी केली. मेट्रो प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी ट्रसची निर्मितीदेखील वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. सिडकोतर्फे हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लवकरच तळोजा क्रॉसिंगवरील या ट्रसचे ‘लॉन्चिंग’ करण्यात येणार आहे. या ट्रसची उभारणी करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन खास या प्रकल्पासाठी आवश्यक तंत्रज्ञनानुसार ‘कस्टमाइज्ड’ पद्धतीने ‘गाईड रोलर’ तयार करण्यात आले आहेत. 
     याशिवाय  मेट्रो लाईन 1 वरील स्थानक क्र. 1, 10, 11 व तळोजा येथील डेपोची देखील व्यवस्थापकीय संचालकांनी पाहणी केली. सदर डेपो हा अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त असून भारतातील चेन्नईमधील मेट्रो डेपोच्या समतुल्य उभारण्यात येत आहे. मेट्रो स्थानकांच्या फोरकोर्ट परिसरामधील विविध कामे व सेवा सुविधांसंदर्भातील निविदा प्रक्रीयादेखील लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून मेट्रो कार्यान्वित होण्यासोबतच या परिसराचा विकासदेखील एकाच वेळी करणे शक्य होणार आहे. 
     मेट्रो प्रकल्पाच्या पाहणीसोबतच व्यवस्थापकीय संचालकांनी बेलापूर रेल्वे स्थानकावरील सुरू असलेल्या विविध दुरूस्ती कामांची पाहणी केली. ही कामे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करावीत, ज्यामुळे रेल्वे स्थानकावरील सर्व सेवा-सुविधा दिर्घ काळासाठी नागरिकांच्या उपयोगी पडतील याची दक्षता घेण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालकांनी दिले. 
     मेट्रो प्रकल्प व त्याचप्रमाणे रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व कामे सिडको युद्धपातळीवर पूर्ण करत आहे असे उद्गार उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी या पाहणी दौऱ्या दरम्यान काढले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad