सुविधा भूखंडावरील मद्यपार्टीचे आयोजन बंद करून, कायदेशीर कारवाईद्वारे 'ठाणे क्लब'ची नोंदणी रद्द करण्याची 'धर्मराज्य पक्षा'ची मागणी
ठाणे (बदलापुर विकास मिडिया)- सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा लाभलेल्या ठाणे शहरातील रहेजा कॉम्प्लेक्स येथील सुविधा भूखंडावर ‘दि ठाणे क्लब’तर्फे नववर्षाच्या स्वागतार्थ व ३१ डिसेंबरच्या निमित्ताने ‘The Craziest Party’चे आयोजन करण्यात आले असून, या पार्टीमध्ये गायन-वादनासह, मद्यपानाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांनी वितरित केलेल्या एस.एम.एस.द्वारे जाहीर झाले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘धर्मराज्य पक्षा’चा ठाणे महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडावरील या ध्वनिप्रदूषण करणाऱ्या पर्यावरणविरोधी व बेकायदेशीर मद्यपार्टीस विरोध असल्याचे पत्र ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांना सन २०१५ पासून पाठविली असून, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी आग्रही मागणी पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
दरम्यान, पूर्वाश्रमीच्या ‘जॉन्सन टाईल्स’ कंपनीच्या जागेत रहेजा कॉम्प्लेक्स उभारण्यात आल्यानंतर विकास नियंत्रण नियमानुसार, ठाणे महानगरपालिकेने सदर क्लबची जागा ‘सुविधा भूखंड’ म्हणून आरक्षित केली होती. एमआरटीपी ऍक्ट, १९६६, सेक्शन २(२) नुसार सुविधा भूखंडावर कोणत्याही प्रकारची पार्टी आयोजित करण्यास मनाई असताना, या क्लबला आपण काही विशेष बाब म्हणून मद्यपान कार्यक्रमाचा परवाना दिला आहे का? ‘दि ठाणे क्लब’ने सर्व प्रकारचे नियम पायदळी तुडवून, या मद्यपार्टीचे आयोजन केल्याने, ठाण्याच्या सांस्कृतिक परंपरेला धोका निर्माण झाला असल्याची तीव्र भावना ठाकूर यांनी व्यक्त केली आहे. मूठभर धनदांडग्यांच्या हौसेखातर ऐतिहासिक ठाणे शहराची संस्कृती या प्रकारामुळे अपमानीत होण्याची परिस्थिती उद्भवलेली असल्याने, आपण या संतापजनक प्रकारावर गांभीर्याने लक्ष घालून, योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी महेशसिंग ठाकूर यांनी आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठवलेल्या या पत्रात शेवटी केली आहे.
No comments