Header Ads

  • ताजा खबरें

    भिवंडी महापालिकेची २८५ कोटी रुपयांची थकबाकी चुकविणाऱ्या ‘टोरेंट पॉवर’ कंपनीला ठामपाने परवानगी नाकारावी!

    ● ‘धर्मराज्य पक्षा’ची आयुक्तांकडे मागणी

    ठाणे (बदलापुर विकास मिडिया):- ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-निजामपूर महापालिकाक्षेत्रातील शहरी विभाग, तसेच भिवंडी तालुक्यातील ग्रामीण परिसरात ‘टोरेंट पॉवर’ या वीजपुरवठा करणाऱ्या खासगी कंपनीची नियुक्ती राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने केली असून, गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ही कंपनी भिवंडी शहर व ग्रामीण भागात वीजपुरवठा करीत आहे. मात्र ‘टोरेंट’ कंपनीचे विद्युत ट्रान्सफार्मर्स, विजेचे खांब, केबल्स आणि कंपनीची कार्यालये महापालिकेच्या हद्दीत असूनही, संबंधित कंपनीने सन-२००७ पासून भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची तब्बल २८५ कोटी रुपयांची थकबाकी चुकविलेली असून, ठामपा आयुक्तांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि ठाणे महानगरपालिकाक्षेत्रात सदर कंपनीला परवानगी नाकारावी अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
    दरम्यान, याच अनुषंगाने ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते नितीन देशपांडे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, ठाणे महानगरपालिकाक्षेत्रातील कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघात येत्या काळात, राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीजपुरवठा करणाऱ्या ‘टोरेंट पॉवर’ या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून आम्हांस प्राप्त झालेली आहे. या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने ‘टोरेंट पॉवर’ कंपनीने भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेची थकबाकी चुकविलेली आहे, तोच प्रकार ठाणे महानगरपालिकेच्या कळवा-मुंब्रा परिसरातदेखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच, ठामपाचे प्रशासनप्रमुख या नात्याने, प्रस्तावित खासगी वीजपुरवठा कंपनीस आपण परवानगी नाकारावी, जेणेकरून भविष्यात होणारी ठाणे महानगरपालिकेची आर्थिक फसवणूक टाळता येईल याबाबतची दक्षता घ्यावी, अशी विनंतीदेखील देशपांडे यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात शेवटी केली आहे.


    वाचा - रेल्वेत भरती, विविध पदांकरिता निघाली भर्ती, 35 हजार पगार



    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad