Header Ads

  • ताजा खबरें

    परमपूज्य सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राच्या ५२व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ

    द्विदिवसीय निरंकारी युवा परिसंवादाची सांगता

    नवी मुंबई: परमपूज्य निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवार, दि. २३ डिसेंबर, २०१८ रोजी खारघर सेक्टर-२९ येथील सिडको मैदानामध्ये जमिनीवर फावडे मारुन महाराष्ट्राच्या ५२व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या मैदान सेवांचा शुभारंभ केला. 
    सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात येत्या २५, २६ व २७ जानेवारी, २०१९ रोजी आयोजित केलेल्या या संत समागमाला लाखोंच्या संख्येने निरंकारी भक्तगण उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. कार्यक्रमाच्या स्थळावरच दिनांक २८ जानेवारी, २०१९ रोजी सुमारे १०० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळादेखिल सद्गुरु माताजींच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
    याप्रसंगी भक्तगणांना आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माताजींनी समागम सेवेमध्ये सर्वांनी उत्साहाने व निष्काम भावनेने आपले योगदान देण्याचे आवाहन केले जेणेकरुन समागमाचा कार्यक्रम यशस्वी होऊ शकेल.
    याप्रसंगी संत निरंकारी मंडळाच्या महाराष्ट्राच्या प्रभारी (मेंबर इंचार्ज) पूज्य मोहिनी आहुजा, समागम समितीचे चेअरमन श्री.शंभुनाथ तिवारी यांच्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले मंडळाचे क्षेत्रिय प्रभारी तसेच मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित होते. 
    उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी निरंकारी सेवादल आणि अन्य भक्तगणांनी प्रेम, शांती, विनम्रता, सहनशीलता, विशालता आणि शांतिपूर्ण सह-अस्तित्व यांसारख्या दैवी गुणांच्या विकासासाठी आयोजित केलेल्या या संत समागमाच्या सफलतेसाठी सद्गुरु माताजी व निराकार प्रभुच्या चरणी प्रार्थना केली. 
    संत समागमासाठी मैदान सेवांचे उद्घाटन झाल्यामुळे येणाऱ्या महिनाभरामध्ये निरंकारी भक्तगण मैदानावर जाऊन स्वच्छता, समतलीकरण तसेच कार्यक्रमासाठी लागणारे पंडाल, तंबू, प्रवेशद्वारे इत्यादी तयार करण्याची सेवा करत राहतील. 
    या सेवांद्वारे हे मैदान शामियान्यांनी नटलेल्या एका नगरीचे रुप धारण करील ज्यामध्ये कार्यक्रमाच्या मुख्य मंडपासह, भक्तगणांच्या राहण्याची, भोजनाची व्यवस्था, कॅन्टीन, विविध कार्यालये, प्रकाशन स्टॉल इत्यादींची व्यवस्था असेल. 
    निरंकारी युवा परिसंवादाची सांगता
    सद्गुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आशीर्वचनांद्वारे २-दिवसीय निरंकारी युवा परिसंवादाची रविवार, २३ जानेवारी, २०१८ रोजी सायंकाळी सांगता झाली.
    हजारोंच्या संख्येने उपस्थित युवा-युवतींना आपले पावन आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी प्रतिपादन केले की, जे ईश्वरीय ज्ञानाच्या प्राप्तीद्वारे आध्यात्मिकदृष्ट्या जागृत झाले आहेत अशा तरुणांनी परिसंवादाच्या पहिल्या दिवशी ठेवलेल्या विविध खेळांमधून जीवन समृद्ध करणारी शिकवण प्राप्त केली.
    सद्गुरु माताजींनी परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी सहा तत्वांच्या बाबतीत जे विचारमंथन करण्यात आले त्यातील सारतत्व समजावताना सांगितले की, ज्याप्रमाणे खीरीमध्ये दूध लपलेले असते तद्वत या पाच तत्वांमध्ये सहावे तत्व म्हणजेच निराकार परमात्मा लपलेला आहे. या निराकार परब्रह्माची व्याख्या समस्त पावन धर्मग्रंथांमध्ये केलेली आहे. हे परमतत्व अविनाशी असून त्याला अग्नि जाळू शकत नाही किंवा पाणी भिजवू शकत नाही. ब्रह्मज्ञानाद्वारे या तत्वाचा बोध प्राप्त करता येतो.
    सद्गुरु माताजी पुढे म्हणाल्या की, दिव्य ज्ञानाची शिकवण आपल्या मन-वचन-कर्मातून प्रतिबिंबित व्हायला हवी. आध्यात्मिक शिकवण धारण केल्यानेच जीवन सहज, सुंदर, आनंदी व सार्थक बनू शकेल. 
    “सहा तत्वे” या विषयावर आधारित असलेल्या या परिसंवादामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वांबाबत दिवसभर लघुनाट्ये, चर्चासत्रे, नृत्ये, मूक अभिनय, प्रेरणादायी भक्तीरचना, अभंगवाणी इत्यादी माध्यमातून शास्त्रीय मिमांसा करण्यात आली आणि सहावे चैतन्य म्हणजेच परमतत्व याची सृष्टिनिर्मिती, स्थिति आणि विलय यामधील महत्वाची भूमिका समजावण्यात आली. परमतत्वाचा जीवनाशी असलेला अन्योन्य संबंध स्पष्ट करुन जीवनाला पूर्णत्व लाभण्यासाठी परमतत्वाचा बोध आवश्यक असल्याचा निष्कर्ष या परिसंवादातून काढण्यात आला. 
    व्यक्तिगत जीवन सुखद बनविण्याबरोबरच जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण नांदण्यासाठी या दिव्य ज्ञानाची परम आवश्यकता या परिसंवादाच्या माध्यमातून प्रतिपादित करण्यात आली. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad