Header Ads

  • ताजा खबरें

    निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या शुभहस्ते खारघर येथे निरंकारी युवा परिसंवादाचे उद्धाटन

    नवी मुंबई:- परमपूज्य निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी शनिवार, दि.२२/१२/२०१८ रोजी निरंकारी युथ फोरमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरंकारी युवा परिसंवादाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाचा पहिला दिवस खेळांसाठी राखीव असल्याने खेळाडूंच्या हातात “खेळ ज्योत” देऊन त्यांनी या खेळांना हिरवा झेंडा दाखवला. ही ज्योत संपूर्ण मैदानावर मिरवण्यात आली. त्यानंतर मुख्य मंचावर आसनस्थ होण्यापूर्वी सद्गुरु माताजींनी शांतीचे प्रतीक असलेला संत निरंकारी मिशनचा श्वेत ध्वज फडकवला. उद्घाटन सोहळ्यामध्ये सद्गुरु माताजींच्या समोर कार्यक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व खेळांचे नमुने अत्यंत रंगतदार पद्धतीने प्रस्तुत करण्यात आले.
    खेळांमध्ये भाग घेतलेल्या उपस्थित तरुणांना आशीर्वाद प्रदान करताना सद्गुरु माता सुदीक्षाजी यांनी प्रथमत: त्यांच्या प्रचंड उत्साहाची प्रशंसा केली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक खेळातून आपल्याला जीवनात धारण करण्यायोग्य अशी काही ना काही शिकवण मिळत असते आपण केवळ शिकत राहण्याची इच्छा बाळगली पाहिजे. सर्वांनी आपले तन, मन आणि आत्मा यांचे सुयोग्य संतुलन ठेवावे असेही माताजींनी सांगितले. 
    युवावर्गाची शक्ती आध्यात्मिकतेकडे वळवून समाजोत्थानासाठी उपयोगात आणणे तसेच मानवी मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याच्या पावन हेतुने हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये मुंबई महानगर प्रदेशातील सुमारे १६००० निरंकारी बंधु-भगिनींनी भाग घेतला आहे, ज्यांचे वय १५ ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे.
    कार्यक्रमामध्ये घेण्यात आलेल्या खेळांमध्ये ॲथलेटिक्स, मैदानी खेळ, अंतर्गत खेळ, योगा, फिटनेस कॉर्नर, हेल्थ कॉर्नर, ॲरोबिक्स इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून मानवतेच्या प्रति जबाबदारीची जाणीव करुन दिली जात आहे. याशिवाय साहित्य वाचनाची रुची वाढविण्यासाठी जाणकार लेखक व ज्ञानी मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत “पुस्तक वाचन” स्टॉलही लावण्यात आला आहे.
    कार्यक्रमाचा मुख्य विषय “सहा तत्वे” - पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि चैतन्य असा आहे. या विषयावर रविवार, दि.२३/१२/२०१८ रोजी व्याख्यान, लघुनाटिका, संतवाणी, भक्तीरचना इत्यादी माध्यमातून विचारमंथन केले जाणार आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad