सिडकोची करंजाडे नोड येथे अनधिकृत बांधकामविरोधी कारवाई
नवी मुंबई (बदलापुर विकास मिडीया)- उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व 2012 च्या जनहित याचिका क्रमांक 138 नुसार सिडको किंवा महाराष्ट्र शासनाकडून कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे निर्देश न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत. त्यानुसार श्री. शिवराज एस. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकामे, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत बांधकाम नियंत्रक (दक्षिण) यांच्या पथकाने रायगड जिल्ह्यातील पनवेल शहर नोडमधील करंजाडे नोड येथील सेक्टर- 2, 3, 4 व 5 मध्ये दि. 27.12.2018 रोजी अनधिकृत बांधकामविरोधी कारवाईचे आयोजन केले होते. सदर कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :
सेक्टर- 2, 3, 4 आणि 5 येथील पदपथांवर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या पत्राशेड व झोपड्या निष्कासित करण्यात आल्या.
सेक्टर- 5 मध्ये अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या 8 वाणिज्यिक टपऱ्या व ढाबा निष्कासित करण्यात आले.
सेक्टर- 3 मधील 12.5 टक्के योजनेकरिता राखीव भूखंडावर अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले भंगाराचे दुकान व अन्य एक दुकान तसेच चिकन शॉपकरिता उभारण्यात आलेली पत्राशेड निष्कासित करण्यात येऊन अंदाजे 400 चौ.मी. क्षेत्र अतिक्रमणमुक्त करण्यात आले.
वर नमूद करण्यात आलेली अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे इ. सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग करून, सिडको महामंळाकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आली होती व सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून ही अतिक्रमणे निष्कासित केली.
पनवेल पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण व 6 पोलीस कर्मचारी यांच्या सहाय्याने सदर कारवाई यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. या कारवाईवेळी सिडकोतील पोलीस पथक, एमएसएफ कर्मचारी व सुरक्षा रक्षक हेही उपस्थित होते.
सदर कारवाई पार पाडतेवेळी 15 कामगार तैनात करण्यात येऊन 1 जेसीबी व 1 ट्रक या साधनांचा वापर करण्यात आला.

No comments