Header Ads

  • ताजा खबरें

    सिडकोमध्ये क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती दिन कार्यक्रम संपन्न

    स्त्रिया व मुलींना शिक्षणाचा अधिकार जर कोणामुळे मिळाला असेल तर तो सावित्रीमाई फुलेंमुळे, असे सांगत कितीही अडथळे आले तरी विचलित न होता आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपले कार्य करत राहावे याचे सावित्रीमाई हे उत्तम उदाहरण आहे, या शब्दांत शिवशाहीर श्री. विजय तनपुरे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचे महत्त्व विशद केले. सिडको भवन येथे दि. 03 जानेवारी 2019 रोजी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या 188 व्या जयंती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सिडको बी. सी. एम्पलॉईज असोसिएशन तर्फे सन 2003 पासून दरवर्षी सावित्रीमाई फुले जयंती दिनाचे आयोजन करण्यात येऊन महामंडळामध्ये उल्लेखनीय सेवा बजावलेल्या महिला कर्मचारी/अधिकारी यांना या निमित्ताने ‘सावित्रीची लेक’ हा पुरस्कार देऊन गौरविण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतो. 
    या कार्यक्रमास श्री. अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक-2, श्रीमती. प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. निलेश तांडेल व सरचिटणीस श्री. जे.टी.पाटील, सिडको प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष श्री. विनोद पाटील, सिडको बी. सी. एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. मिलिंद बागुल, कार्याध्यक्ष श्री. नरेंद्र हिरे व सरचिटणीस श्री. नितिन कांबळे हे उपस्थित होते. 
    कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विजय तनपुरे यांनी आपल्या खुमासदार व नर्मविनोदी शैलीत महापुरुषांचे कार्य विशद करत उपस्थितांची मने जिंकली. महात्मा फुलेंनी समाजसुधारणेची सुरुवात आपल्या घरापासून करत सावित्रीमाईंना शिक्षित केले व नंतर मुलींसाठी शाळा काढण्याचा, त्या काळात क्रांतिकारी ठरावा, असा निर्णय घेतला. सावित्रीमाईंनी समाजसुधारणेच्या व सत्यशोधक समाजाच्या कार्यात महात्मा फुलेंना मोलाची साथ दिली व त्यांच्या निधनानंतरही हा मानवसेवेचा वसा चालू ठेवला, या शब्दांत सावित्रीमाईंच्या कार्याची महती सांगत तनपुरे यांनी सावित्रीमाईंच्या जीवन चरित्राचे विविध पैलू उलगडून दाखवले. 
    सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक-2  श्री. अशोक शिनगारे यांनी तत्कालिन पुरुषप्रधान, जाती व्यवस्था व अनिष्ट रूढींचा पगडा असलेल्या काळात सावित्रीमाईंनी हाती घेतलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचे महत्त्व सांगत त्यांनी समाजासाठी समर्पित भावनेने कार्य केल्याचे सांगितले. त्यांच्या कार्यामुळे उर्जा मिळते असे सांगत ‘तयास मानव म्हणावे का’ या सावित्रीबाईंच्या कवितेचा दाखला देत सावित्रीमाईंना ज्ञान व शिक्षणा प्रति किती तळमळ होती हे दिसून येत असल्याचे सांगितले. 
    कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको यांनी “सावित्रीमाईंच्या कार्यामुळे स्त्रिचे कार्यक्षेत्र व्यापक होण्याबरोबरच स्त्रिची परिभाषाही बदलली आहे”, असे उद्गार काढले. सावित्रीमाईंना अपेक्षित असलेली निर्भिड व निर्भय स्त्री आपण आहोत का याबाबत प्रत्येक स्त्रिने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आज प्रत्येक घरातली सावित्रीची लेक जेव्हा स्त्री उन्नतीसाठी या लढ्यात सामिल होईल तेव्हाच आपण आपल्या भावी पिढीला सक्षम करून सोनेरी भविष्य देऊ शकतो असे सांगत सावित्रीमाईंचा लढा पुढे चालवण्याची जबाबदारी प्रत्येक स्त्रिवर असल्याचे मत व्यक्त केले. 
    या प्रसंगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत उत्तम कामगिरी केलेल्या महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या वर्षीचा ‘सावित्रीची लेक’ हा पुरस्कार  श्रीमती रश्मी चौधरी, उपनियोजनकार व श्रीमती सुचित्रा समेळ, वरिष्ठ श्रेणी लिपिक यांना देण्यात आला.    
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सविता शिंदे तर आभारप्रदर्शन श्री. राहुल कांबळे यांनी केले.  

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad