Header Ads

  • ताजा खबरें

    सिडकोच्या 1,100 घरांच्या गृहनिर्माण योजनेचा ऑनलाईन अर्ज नोंदणी शुभारंभ

    नववर्षाच्या प्रारंभी दि. 01 जानेवारी 2019 रोजी सिडकोच्या 1,100 घरांच्या गृहनिर्माण योजनेच्या ऑनलाईन अर्ज नोंदणीचा शुभारंभ श्री. लोकेश चंद्र, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते निर्मल, मुंबई येथे पार पडला. सदर गृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील पाच नोड्मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांकरिता घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रसंगी श्री. अशोक शिनगारे, सहव्यवस्थापकीय संचालक, श्री. लक्ष्मीकांत डावरे, व्यवस्थापक पणन – 2, श्रीमती. प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. 
    सिडकोतर्फे आजवर विविध गृहनिर्माण योजनांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट यांकरिता घरे बांधण्यात आली आहेत. सिडकोतर्फे महागृहनिर्माण योजना ऑगस्ट 2018 च्या माध्यमातून एकूण 14,838 सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीमध्ये 2 लाखांहून अधिक अर्जदारांनी सहभाग घेतला होता. याच योजनेतील शिल्लक 1100 सदनिकांसाठी सिडकोमार्फत ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. शुभारंभ झाल्यानंतर पहिल्या 5 मिनीटातच 4 अर्जदारांनी नोंदणी केली असून यावरूनच या योजनेलादेखील भरघोस प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. सदर योजने अंतर्गत तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली व द्रोणागिरी या 05 नोड्मध्ये सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठीच्या सदनिका केवळ प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पात्र अर्जदारांसाठी तर अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका योजनेतील अटींनुसार पात्र ठरणाऱ्या अर्जदारांकरिता उपलब्ध असतील. 
    ही योजना सिडकोतर्फे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. डिजीटल माध्यमाचा यथायोग्य उपयोग, पारदर्शकता व विना मध्यस्थ प्रक्रीया हाच या मागचा मुख्य उद्देश आहे. या योजनेतील ऑनलाईन अर्ज प्रक्रीया सुलभ व सहज आकलनीय आहे. ती समजून घेण्याचे पर्यायदेखील संकेतस्थळावर माहिती, चलचित्रफित यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या योजनेसाठी प्रोबेटी सॉफ्ट  या कंपनीमार्फत मोबाईल ॲपदेखील तयार करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेत सहभागी होता येईल असा विश्वास या वेळी श्री. लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला. सदर योजनेच्या ऑनलाईन प्रक्रियेकरिता सिडकोतर्फे https:/lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.  
    सदर योजनेकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणीची व अर्ज भरण्याची सुरूवात मंगळवार, दि. 01 जानेवारी 2019, दु. 12.30 वा. झाली असून बुधवार, दि. 30 जानेवारी 2019, रात्री 11.59 ही अर्ज नोंदणीची तर दिनांक 31 जानेवारी 2019, रात्री 11.59 ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल. गुरुवार, दि. 14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 11.00 वा. 7 वा मजला, सिडको सभागृह, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे सदर योजनेकरिताची सोडत काढण्यात येईल. सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नावे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सायं. 06.00 वा. सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. सदर योजने संबंधीच्या सविस्तर माहितीकरिता अर्जदारांनी उपरोक्त संकेतस्थळास भेट द्यावी, असे सिडकोतर्फे कळविण्यात येत आहे. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad