Header Ads

  • ताजा खबरें

    वरचे ओवळे गावाचा मंदिर उस्थापन सोहळा संपन्न

    भव्य मिरवणूकीतून मंदिरातील देवांचे झाले विमानतळ पुनर्वसन क्षेत्रात वाजत गाजत विस्थापन
    आजचा हा मंदिरातील देवांचा विस्थापन सोहळा म्हणजे वरचे ओवळे गावासोबतच विमानतळ उभारणीच्या या प्रवासातील एक ऐतिहासिक क्षण आहे. या गावाने अतिशय सकारात्मकरित्या सिडकोला नेहमीच सहकार्य केले आहे. व आज देखील मंदिराचे बांधकाम अजूनही सुरू असतानादेखील नवीन वर्षाच्या मुहूर्तावर देवांचे विस्थापन करण्याचा निर्णय संपूर्ण गावाने उस्फूर्तपणे घेऊन एक आगळा वेगळा आदर्श मांडला आहे असे उद्गार सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका श्रीमती. प्राजक्ता लवंगारे वर्मा यांनी काढले. वरचे ओवळे गावच्या मंदिर विस्थापन सोहळ्याप्रसंगी त्या उपस्थित होत्या. वरचे ओवळे गावातील ग्रामस्थांनी आज रथातून भव्य मिरवणूक काढून गाव मंदिरातील ग्रामदैवत व कुलदैवताचे विमानतळ पुनर्वसन क्षेत्रात विस्थापन केले. या प्रसंगी सर्व प्रकल्पबाधितांच्या चेहऱ्यावर अनोखा उत्साह व आनंद स्पष्ट दिसत होता. 
     सदर कार्यक्रमासाठी श्री. राजेंद्र धायटकर, मुख्य अभियंता (न.मुं.आं.वि.), श्री. विजय पाटील, अतिरिक्त भूमी व भूमापन अधिकारी (न.मुं.आं.वि.), श्री. अरूण देशमुख, अधिक्षक अभियंता (विमानतळ 2) व सिडकोचे अधिकारी उपस्थित होते. दिनांक 31 डिसेंबर 2018 रोजी गावातील ग्रामदैवत व कुलदैवत श्री. गणेश व श्री. काळभैरव यांचे उस्थापन व प्राण-प्रतिष्ठापना विधीदेखील साग्रसंगीत पार पडले. आज देखील रथामध्ये देवांची ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. भारताच्या इतिहासात प्रथमच प्रकल्पबाधितांच्या चेहऱ्यावर विस्थापन करताना आनंद, उत्साह व समाधान यांचे मिश्रण पहायला मिळाले. याचे कारण म्हणजे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प व अनुषंगिक कामासाठी स्थलांतरीत होणाऱ्या बांधकामाबद्दल प्रकल्पबाधितांना 22.5% व पुनर्वसन व पुनःस्थापना योजनेंतर्गत देशातील सर्वोत्तम पॅकेज देण्यात आले आहे. वरचे ओवळे ग्रामस्थांनीदेखील एक पाऊल पुढे येऊन नवी  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यास मोलाचे सहकार्य केले आहे. 
     प्रकल्पबाधितांना देण्यात येणाऱ्या सर्वोत्तम पॅकेजसोबतच प्रकल्पबाधितांच्या गाव मंदिरांसाठी सिडकोतर्फे पुनर्वसन व पुन:स्थापना क्षेत्रात भूखंडदेखील देण्यात आले आहेत. वरचे ओवळे गावाव्यतिरिक्त विमानतळ प्रकल्पबाधित दहा गावांपैकी प्रकल्पबाधित कोल्ही गावाच्या मंदिरासाठीदेखील काही महिन्यांपूर्वी बांधकाम परवाने देण्यात आले असून या गावातर्फेदेखील मंदिर बांधणीचे काम वेगाने सुरू आहे. अशा प्रकारचेच सहकार्य उर्वरित गावांनीदेखील करावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात येत आहे. 
     विमानतळ प्रकल्पबाधित सर्व दहा गावांच्या मागण्यांनुसार त्यांच्या गावांमधील सर्व मंदिरांसाठी एक भूखंड देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार दहा गावांपैकी वरचे ओवळे, कोल्ही, तरघर, चिंचपाडा, गणेशपुरी, उलवे व कोपर या गावांतील मंदिरांसाठी भाडेपट्टा करारनामा करण्यात आला आहे. सिडकोतर्फे गावातील मुख्य मंदिराच्या बांधकामासाठी रू. 1 कोटी देण्यात येणार असून भाडेपट्टा करार केल्यानंतर बांधकाम सुरू करण्यासाठी त्या रू. 1 कोटी निधीतील 50 टक्के रक्कम आगाऊ देण्यात येणार आहेत. तर इतर सार्वजनिक मंदिरांसाठी त्यांच्या मूल्यांकनानुसार रक्कम देण्यात येणार आहे. 
     या संदर्भात सिडकोतर्फे इतर प्रकल्पबाधित गावांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनीदेखील लवकरात लवकर गाव मंदिरांसाठीच्या बांधकाम परवान्याची प्रक्रिया पूर्ण करून नवीन मंदिराच्या बांधकामास सुरूवात करावी. प्रकल्पबाधितांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा यासाठी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद व सर्वतोपरी सहकार्य दिले आहे. यामुळेच विमानतळाचे काम योग्य दिशेने व वेगात सुरू आहे. प्रकल्पबाधितांच्या अशाच सातत्याने मिळत असलेल्या सहकार्यामुळे राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मुदतीत हा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही. 

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad