Header Ads

  • ताजा खबरें

    ठाण्यात दुसऱ्या सायकल मित्र संमेलनाचे आयोजन

    विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणार ‘सायकल मित्र संमेलन ‘
    देशभरातून सायकलस्वार होणार सहभागी
    organizing-second-bicycle-friend-gathering-in-thane ठाणे(४): ठाणे महापौर चषक सायकल स्पर्धेअंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग, ठाणे महानगरपालिका,ठाणे  पोलीस आयुक्तालय, रिसायकल क्लब, स्वत्व आणि आय कॅन यांच्या सहकार्याने २ रे सायकल मित्र संमेलन रविवार दिनांक ३ फेब्रुवारी २०१८ रोजी संमेलनाध्यक्ष दीपक मेजारी व सभागृह नेते नरेश म्हस्के यांच्या  स्वागताध्यक्षेतेखाली डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे संपन्न होणार  आहे. अशी माहिती आज महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
          या पत्रकार परिषदेस सभागृह नेते नरेश म्हस्के,क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती दिपक वेतकर, अतिरिक्त आयुक्त (२) समीर उन्हाळे,  क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, उप खातेप्रमुख दिलीप पाटील, अँड.स्वाती दीक्षित, जितेंद्र वैद्य,कौस्तुभ दामले, आरती कुलकर्णी,वर्षा उघले, अश्विनी जोशी, शशांक वैद्य,विलास वैद्य,राजेश खांडेकर, श्री.केसरकर आदी उपस्थित होते.
         या संमेलनासाठी  महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण,क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ना.विनोद तावडे, ना.राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे,महापौर सौ. मीनाक्षी राजेंद्र शिंदे, जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर,  महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  
           डोंबिवली सायकल क्लब, नॅशनल युथ ऑर्गनायझेशन आणि क्रीडाभारती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी डोंबिवली येथे १ ले सायकल मित्र संमेलन पार पडले. या संमेलनाच  प्रतिसाद पाहून ठाण्यात २ रे सायकल मित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह  येथे रविवार दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९ ते दुपारी ५ यावेळेत हे संमेलन आयोजित करण्यात आले असून वैद्यकीय तज्ञ, उद्योजक,व्यावसायिक तसेच अनुभवी सायकलपटू यांचे मार्गदर्शन या संमेलनात आयोजित केले आहे.
           रिसायकल क्लब, स्वत्व आणि आय कॅन, डोंबिवली सायकल क्लब व क्रीडाभारती डोंबिवली सायकल क्लब ,क्रीडाभारती, फुटार्दो'ज स्कुल ऑफ म्युझिक, मै चलाऊंगी, व्हिल्स अँड बॅरेलस, एफओसीआय, रोटरी क्लब ऑफ ठाणे सबर्बन, इनर्वहिल क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी, संस्कार भारती, फोर्टीस हॉस्पिटल अशा अनेक संस्थाचे विशेष सहकार्य या संमेलनासाठी लाभले आहे.
         सायकल चालवणारा 'बिब्या' हा तरुण या बोधचिन्हाचे व मानसी कुलकर्णी यांनी रचलेले ,चिंटू भोसले यांनी संगीतबद्ध केलेले आणि फुटयार्दो'ज स्कुल ऑफ म्युझिक मुंबई अँड ठाणे यांच्या विशेष सहकार्याने तयार केलेल्या सायकलविषयक जनजागृती करणाऱ्या संमेलनगीताचे आज उपस्थित मान्यवरांच्या  शुभहस्ते अनावरण करण्यात आले.
           या संमेलनात सायकलविषयक विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये निबंधस्पर्धा (शालेय व खुला गट), चित्रीकरण स्पर्धा (शॉर्ट फिल्म), छायाचित्र स्पर्धा,पोस्टर,पेंटिंग,चित्रकला, व्यंगचित्र, कोलाज, व रांगोळी अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे.
           रविवार दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ७ वाजता शिवाजी मैदान, जांभळी नाका ते काशिनाथ घाणेकर सभागृह अशी अंदाजे १० किमी लांबीची सुमारे १००० हून अधिक सायकलस्वारांची सायकलफेरीही आयोजित करण्यात आली आहे.
          तदनंतर सकाळी ८ वाजता काशिनाथ सभागृह येथे पोलीस बँड आयोजित करण्यात आला असून त्यानंतर सकाळी ८.३० वाजता  फुटयार्दो'ज स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई यांच्यावतीने  मनोरंजनाचा  कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. त्याचदरम्यान संमेलनासाठी नोंदणी करण्यात येणार असून  ८.३० वाजता संमेलनाचे उदघाटन करण्यात येणार आहे.  
           सायकल हे वाहतुकीचे प्रमुख साधन बनवून आर्थिक आणि आरोग्य यामधील सामाजिक दरी  दूर करण्याचे साधन म्हणून सायकल हा पर्याय पुढे यावा तसेच नागरिकांनी  आपली  वाहतुकीची समस्या, आरोग्यविषयक समस्या अशा सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा याकरिता  प्रोत्साहन देणे हा या संमेलनाचा मुख्य  हेतू आहे. 
           सायकलिंग करताना आरामदायी प्रवास करता येणे, वैयक्तिक आरोग्य- शारीरिक आणि मानसिक आरोग्य उंचावणे,सामाजिक आरोग्य- वाहतुकीदरम्यान होणारे कार्बनचे उत्सर्जन थांबवणे,सायकल जगत- घट्ट बंध असलेले, सर्वसमावेशक नाते जुळलेले सायकलजगत अस्तित्वात येणे आणि वृद्धिंगत करणे, स्वतः सायकलिंग आणि रिसायकलिंग (पुर्नवापर) करत गरजू व्यक्तिनांही सायकल दान करत सायकलजगतातील बंध घट्ट करणे, समाजातील कोणत्याही सामाजिक,शैक्षणिक स्तरातील, वयातील, गटातील व्यक्तींना सायकल हया वाहतूक साधनाची समान उपलब्धता निर्माण करणे, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी सायकलिंगद्वारे नागरिकांना जागृत करणे, त्याचा प्रसार करणे, पाठपुरावा करणे,जागरूक नागरिक स्वयंस्फूर्तीने, सामाजिक जाणिवेने प्रगल्भ होत समाजप्रबोधन करत असतात. त्यांना प्रोत्साहन देणे,व सायकलिंग मुळातच आनंददायी आहे, तो आनंद घेत, छंद जोपासत आपले जग समृद्ध करणे आदी गोष्टीबाबत जागरूकता या संमलेनाद्वारे वाढवणे या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या सायकल संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
             रविवार दिनांक ३ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९ वाजता  संमेलनाचे  उदघाटन झाल्यानंतर  दिवंगत सायकलपटू खळे काका यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.त्यानंतर पुणे येथे सायकल संग्रहालय निर्माण करणारे  विक्रम पेंडसे व आशियातील सर्वात तरुण आयर्नमन  रविजा सिंघल यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच मुलुंडकी सायकलवाली आणि मुंबईतील सायकल टू वर्कची आदर्श फिरोझा सुरेश यांचे सादरीकरण होणार आहे.तसेच महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाच्यावतीने  सायकलविषयक धोरणांची माहिती दिली जाईल.त्यानंतर सायकलपटूंच्या सायकलसफरीविषयक मुलाखती घेतल्या जातील.यामध्ये डॉ महाजन बंधू, ले कर्नल भारत पन्नु, श्री. उल्हास जोशी, श्री.  योगी, लिली पानीच (अमेरिका), पनिंग यामे ( आसाम), टाका तामुत ( अरुणाचल), संतोष दुबे (एयर फोर्स, आसाम) यांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत.
          मेकिंग ऑफ आयर्न मॅन या कार्यक्रमांतर्गत आयर्न मॅन चेतन अग्निहोत्री, आयर्न मॅन अमर मियाजी, डॉ.मिलिंद पिंपरीकर, डॉ. नेमुस्तफा टोपीवाला यांचे मार्गदर्शन होईल.त्यानंतर सांगीतिक मनोरंजनाचा कार्यक्रम व  तज्ञ सायकलपटू यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण होईल. संमेलनाची सांगता ओरोबोरस या सायकल कंपनीतर्फे लकी ड्रॉ द्वारे दोन भाग्यवान विजेत्यांना २ सायकली भेट देण्यात येतील.तरी ठाण्यातील या सायकल मित्र संमेलनासाठी ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad