Header Ads

  • ताजा खबरें

    प्रधानमंत्री आवास योजना ; अंबरनाथ व ठाण्यातील लाभार्थींशी मुख्यमंत्र्यांचा मनमोकळा संवाद

    कुठल्याही लालफितीशिवाय हक्काचे घर मिळाल्याची भावना व्यक्त
    pradhan mantri aawas yojana thane and ambernath beneficiaries chating with maharashtra chief minister devendra fadnavis news badlapur vikas ठाणे (बदलापुर विकास मिडिया) दि २: “ इतके गरीब आहोत की आपले पक्के घर असेल असा स्वप्नात देखील विचार केला नव्हता, मात्र आमच्यासारख्या मोलमजुरी करणाऱ्याला आज स्वत:चे घर झाले साहेब....” वज्रेश्वरीची सुनीता हे बोलत असतांना भावूक झाली. समोरच्या पडद्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खुद्द आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेतील घराविषयी विचारताहेत म्हटल्यावर ४० वर्षीय सुनीता प्रदीप बरफने आपला घरापर्यंतचा प्रवास कसा झाला ते मनमोकळेपणाने सांगितले.  घर मंजूर होताना किंवा नंतर कुणाला काही पैसे द्यावे लागले का असेही मुख्यमंत्र्यांनी विचारले तेव्हा सुनीताने “ एकबी रुपया कुनाला द्यावा लागला नाही सायेब” असे ठामपणे उत्तर दिले. अंबरनाथ तालुक्यातील दहिवली येथील कैलास धुळे यांच्याशी देखील मुख्यमंत्री बोलले.
    शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘लोकसंवाद’ या माध्यमातून जाणून घेत आहेत.
    आज सर्वप्रथम प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थींशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ठाणे जिल्ह्यातून रमाई , शबरी तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण चा लाभ घेतलेले निवडक १६ लाभार्थी यासाठी उपस्थित होते.
    वीरबाला हाली बरफच्या घराची मुख्यमंत्र्यांकडून विचारपूस
    आपल्या मोठ्या बहिणीसह  तानसा अभयारण्यात सरपण गोळा करण्याकरता गेलेल्या हाली बरफया २० वर्षीय आदिवासी युवतीने बिबळ्याशी मुकाबला करून त्याला पळवून लावले होते आणि बहिणीची सुटका केली होती . तिला राष्ट्रीय वीरबाला शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हालीला देखील शबरी आवास योजनेतून २०१७-१८ मधून घर मंजूर झाले असून २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळाला आहे आणि आता जोत्याचे काम सुरु आहे असे तिने कॉन्फरन्समध्ये सांगितले. मुख्यमंत्र्यांनी देखील तिच्या धाडसाचे कौतुक केले आणि घराच्या बांधकामाविषयी विचारपूस केली.
    आपल्याला आता नोकरी मिळाली आहे त्यामुळे कुटुंबाची गुजराण सुरु आहे असे देखील तिने यावेळी सांगितले.
    असे झाले सुनीताचे स्वप्न साकार
    वसई जवळच्या एका इंजेक्शन,सलाईन बाटल्या तयार करणाऱ्या कंपनीत कामगार म्हणून काम करीत असलेल्या ४० वर्षीय सुनीता प्रदीप बरफच्या दृष्टीने आजचा दिवस भाग्याचा होता. एवढ्याचसाठी तिने आज सुट्टीही घेतली होती. अकलोली गावाजवळ एका वस्तीतल्या झोपडीत अतिशय कष्टात घालवलेले दिवस तिला आठवत होते. भिवंडी तालुक्यातील या छोट्याशा गावाजवळ झोपडीच्या ठिकाणी आपल्याला हक्काचे शाबूत चांगले घर मिळाले आहे ही कल्पनाच मुळी सुनीताला स्वप्नवत होती. कमालीची गरिबी पाहिलेली आणि स्वत:चे घर ही संकल्पनाच तिला दुर्लभ होती.
    माहेर तर सोडाच पण सासरची सुद्धा गरीबीच. नवरा सुद्धा कुठेतरी मोलमजुरी करणारा. शिक्षण सातवीपर्यंत झालेले त्यामुळे अक्षर ओळख असलेली सुनीता वसईच्या एका कंपनीत काही वर्षांपूर्वी कामाला लागली पण मिळणारा पगार फक्त स्वत:चे आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी होता. मुलगी पण मोठी झालेली, तिनेही हातभार लावायला सुरुवात केली पण इतक्या तुटपुंज्या कमाईवर स्वत:चे घर कसे घेणार? कोणती बँक मदत करणार? कुणी पैसे उसने दिले तरी त्याच्या परतफेडीचे काय? किती व्याज भरावे लागेल? या विवंचनेत सुनीता होती. आपले सगळे आयुष्य डोक्यावर छत कधी पहायला मिळाले  नाही, पुढे देखील काही खात्री नाही या विचारात असतांनाच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी एकेदिवशी हिच्यासमोर एक पंतप्रधान आवास योजनेचा अर्ज पुढे केला आणि माहिती दिली. अर्ज करायला काय जातेय म्हणून तिने तो भरला आणि काही दिवसांतच भिवंडीला आयडीबीआय बँकेत खाते उघडण्यासाठी निरोप आला. बरोबर मदतीसाठी अधिकारी होतेच. सुनितासाठी हा आनंददायी धक्का होता. थेट बँकेत पैसे जमा होणार आणि ते सुद्धा घराच्या बांधकामासाठी हे जेव्हा तिने नवऱ्याला सांगितले तेव्हा त्यालाही हे खरे वाटेना.
    अवघ्या काही दिवसांतच ३० हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाल्याचा निरोप सुनीताच्या मोबाईलवर आला. आणि मग हरखलेल्या सुनीताने आणि तिच्या नवऱ्याने लगबगीने गवंडी गाठले. पहाता पहाता पाया आणि कोबा घातला गेला. एव्हाना दुसरा हप्ता ६० हजाराचा जमा झाला आणि भिंती उभ्या राहिल्या. तिसरा हप्ता ३० हजारचा आला आणि घरावर दणकट पत्रे चढले. ८ हजार रुपये रोहयोतून मजुरीसाठी आणि १२ हजार शौचालयासाठी देखील रक्कम मिळाली.  घराचे स्वप्न पूर्ण झाले. ते सुद्धा अवघ्या वर्षभरात.
    दहीवलीच्या कैलास धुळेंशी पण मुख्यमंत्र्यांचा संवाद

    pradhan mantri aawas yojana thane and ambernath beneficiaries chating with maharashtra 1 chief minister devendra fadnavis news badlapur vikas अंबरनाथ तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायत येथील कैलास धुळे यांच्याशी थेट मुख्यमंत्री स्वत: बोलल्याने ते त्यांची पत्नी आणि आई हे खूपच आनंदी झाले होते.
    कॅमेऱ्यात दिसणारे प्रधानमंत्री आवास योजनेतील घर पाहून मुख्यमंत्री यांनी त्यांचे कौतुक केले. हे घर आपण स्वत: बांधल्याचे धुळे यांनी सांगितले. शेती करीत असून स्वत:चे घर मिळाल्याने परिवार खूप आनंदी झाला असे ते म्हणाले. धुळे यांची आई व पत्नी देखील मुख्यमंत्र्यांशी बोलल्या आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.
    कैलास धुळे यांना २०१६-१७ मध्ये हे घर मंजूर झाले असून घरकुल यासाठी १ लाख २० हजार रक्कम मिळाली तसेच ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरीसाठी १५ हजार मिळाले.  
    आज व्हिडिओ कॉन्फरन्सच्यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांची देखील उपस्थिती होती.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad