Header Ads

  • ताजा खबरें

    मागास हिंदू आघाडी उभारणार राममंदिर -आ. हरिभाऊ राठोड यांची घोषणा

    ठाणे (बदलापुर विकास मिडिया)- निवडणुका आल्या की शिवसेना आणि भाजपला राम मंदिराची आठवण येत असते. पण, राम आणि हनुमान हे बहुजनांची दैवते आहेत. त्यामुळे आम्हीच रामाचे मंदिर उभारणार आहोत; त्यासाठी आम्ही मागास हिंदू आघाडीची स्थापना करीत आहोत, अशी घोषणा आ. हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. 
    गुरुवारी (दि.3) बजाज भवन, विधान भवन येथे सर्व ओबीसी जाती समूहांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही घोषणा केली. यावेळी शंकर पवार, लक्ष्मण राठोड, पुरीयादव राठोड, हरिलाल राठोड, सुंदर जाधव, लक्ष्मण चौहाण आदी उपस्थित होते. 
    हरिभाऊ राठोड म्हणाले की, राम मंदिर बांधायच्या घोषणा कितीही जणांनी केल्या असल्या तरी आमच्या बहुजनांशिवाय हे मंदिर उभेच राहू शकत नाही. आमचे हात लागले तरच या मंदिराची उभारणी होणार आहे. त्यामुळेच आम्ही मागास हिंदू आघाडीच्या माध्यमातून राम मंदिराची उभारणी करणार आहोत. राम मंदिरासाठी आम्ही सर्व आघाड्यांवर लढा देणार आहोत. 
    मराठा आरक्षणाच्या बाबातीत ते म्हणाले की, मराठ्यांना देण्यात आलेले 16 टक्के आरक्षण हे नियमबाह्य आहे. त्यांची लोकसंख्या अवघी साडे सात टक्के असताना त्यांना 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे आहे. बाळासासाहेब सराटे यांनी ओबीसी आणि भटके-विमुक्तांच्या आरक्षणाला आव्हान दिले आहे. या संदर्भात आपण स्वत: न्यायालयात ओबीसी आणि भटके विमुक्तांची बाजू मांडणार आहोत. न्यायालयासमोर वंचितांची बाजू मांडून 16 टक्के आरक्षण कसे असंविधानिक आहे, हे पटवून देणार आहोत. या संदर्भातील पूर्व तयारी म्हणून 3 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता बजाज भवन तळमजला मुंबई येथे ओबीसींच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीला माजी आपल्यासह आमदार प्रकाश शेंडगे, श्रावण देवरे, बालाजी शिंदे, मच्छिंद्र भोसले, चंद्रकांत बावीस्कर, सुषमा अंधारे यांच्यासह राज्यभरातील सर्वच ओबीसी नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, प्रकाश आंबेडकर यांची बहुजन वंचित आघाडी ही सक्षम पर्याय उभा करु शकत नाही. ते काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्याचे काम करणार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या आघाडीमध्ये जाऊन सेना- भाजपला पूरक अशी भूमिका घेणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 
    दरम्यान, हे भाजप सरकार हे जनविरोधी असून वंचितांना अधिकच डावलण्याचे काम करण्यात येत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी 5 जानेवारी रोजी आझाद मैेदान येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणामध्ये सहभागी होणारे लोक आपल्या पारंपारिक वेशभूषेमध्ये येणार आहे, असेही आ.राठोड यांनी सांगितले.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad