Header Ads

  • ताजा खबरें

    घोडबंदर पट्ट्यातील वाहतूक कोंडीवर तत्काळ मार्ग काढा ; विरोधी पक्षनेत्यांची पालिका प्रशासनाकडे मागणी

    ठाणे (प्रतिनिधी)-मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीला रस्त्याच्याा कडेला होणारी बेकायदा पार्किंगच जबाबदार आहे. या भागात असलेल्या शो रुम आणि गॅरेजेसच्या वाहनांनी सेवा रस्ता व्यापालेला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे ठामपा प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा काढावा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असे पत्र ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलींद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. 
    घोडबंदर परिसर हा नवे ठाणे म्हणूनही ओळखला जातो. परंतु, सध्या येथील चारपदरी रस्त्यावर आणि सेवारस्त्यावरही वाहतूककोंडी होत आहे. यावर उपाय काढणे तर सोडाच, परंतु ही कोंडी कशी फुटेल, यासाठीही प्रशासनाकडून प्रयत्न होत नाहीत. मागील काही महिन्यांपासून या भागात वडाळा ते गायमुख या चौथ्या मेट्रोमार्गाचे काम सुरू झाले आहे.  मेट्रोच्या कामासाठी घोडबंदर भागात अनेक ठिकाणी कुठे सेवारस्त्यावर, तर कुठे मुख्य रस्त्याच्या मधोमध पत्रे लावले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आहे. भरिस भर, हे काम सुरू असतानाच पातलीपाड्यापासून पुढे पालिकेच्या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यांवर सिव्हरेज लाइन टाकण्याचे कामही वेगाने सुरू आहे. मुख्य रस्त्यावर वाहतूककोंडी असल्याने वाहनचालक सेवारस्त्यांचा वापर करीत आहेत. परंतु, हे सेवारस्ते आधीच पार्किंगने फुल्ल झाले आहेत. विविध शोरूम, गॅरेजचालकांच्या गाड्या याच सेवारस्त्यांवर पार्क होत असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे.  मेट्रोचे निर्माण करणार्‍या रिलायन्स कंपनीने नेमलेले वाहतूक सेवकही प्रशिक्षित नसल्याने ही वाहतूक कोंडी वाढीस लागलेली आहे. या संदर्भात पोलिसांनी नोटीसही बजावलेली आहे.  
    आता दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु होणार आहे. त्यावेळी अशी वाहतूक कोंडी राहिली तर जनतेचाा उद्रेक होण्याचा धोका आहे.  त्यामुळे पालिका प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी पाटील आणि देसाई यांनी केली आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad